देवरुख : शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण नदीत बुडताना त्यांना सहकाऱ्यांनी वाचवल्याची घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. दोन्हीही तरुणांची प्रकृती स्थिर आहे.
शहर परिसरातील गणपतींचे मोठ्या प्रमाणात सप्तलिंगी नदीपात्राच्या मच्छी मार्केट परिसरामध्ये विसर्जन होत असते. विसर्जन केलेले गणपती झाडा-झुडुपांमध्ये अडकतात. हे गणपती दुसऱ्या दिवशी खालच्या आळीतील तरुण पुन्हा पाण्यात विसर्जन करतात. बुधवारी सायंकाळी खालची आळी येथील तरुण नदीपात्रात उतरून अडकलेले गणपती विसर्जन करत होते.
एवढ्यातच पाण्याचा मोठा लोंढा आल्यामुळे आशय बारटक्के हा तरुण बुडू लागला. ही बाब सहकारी सुवारे या तरुणाच्या लक्षात येतात त्याने बारटक्के याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बारटक्के याने सुवारे याला मिठी मारल्यामुळे सुवारे हाही बुडू लागला. मात्र, सहकाऱ्यांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर काढत त्यांचे प्राण वाचले आहेत. दोघांनाही देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:23 AM 05/Sep/2025














