चिपळूण : वालोपे येथे हातभट्टीवर पोलिसांची धाड

चिपळूण : शहरानजीकच्या वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदी किनारी येथील पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून सुमारे लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात एकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने चिपळूणमध्ये गावठी हातभट्टी सुरू असल्याचे उघड झाले आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अतुल सुधीर ठाकूर यांनी दिली आहे. यानुसार पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्ठी नदीकिनारी झाडी झुडपामध्ये छापा टाकला असता या ठिकाणी एक जण गावठी दारू गाळत असताना आढळून आला. तसेच यावेळी दारू उपयोगी साहित्य गुळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन मिळून आले. सुमारे १ लाख ९ हजार ९०० रुपयांचा हा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पेढे- परशुराम येथील मंगेश मधुकर दिवेकर ( वय २७) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हारगुडे, पोलिस हवालदार प्रितेश शिंदे, अतुल ठाकूर, श्रीनिवास जानवलकर यांनी केली. या कारवाईने वालोपे येथे हातभट्ट्या सुरू असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे चिपळूण शहरासह ग्रामीण भागात छोटे – छोटे दारू धंदे सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याकडे देखील पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 21-10-2024