Chiplun walawalkar Hospital : वालावलकर रुग्णालयाने वाचवले चार बाळांचे प्राण

चिपळूण : ऑगस्ट महिन्यात एकाच आठवड्यात अतिजोखीम चार असलेल्या बाळांचे प्राण वाचवण्यात वालावलकर रुग्णालयाच्या बालरोग विभागाला यश आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे निपुण डॉक्टर तर आहेतच; पण सुसज्ज असा १० बेडचा आयसीयू ज्यामध्ये वॉर्मर, ऑक्सिजन, बाळाला पेटीमध्ये ठेवण्याची व्यवस्था, व्हेंटिलेटर, एक्स-रे मशिन, सीपीएपी, रक्तपेढी आदी सुविधा आहेत. या सर्व सुविधा महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत आहेत. त्यामुळेच वालावलकर रुग्णालय गरीब रुग्णांसाठी नवसंजीवनी बनले आहे.

ती नवजात बालके दापोली तालुक्यातील नेवसे गावातील होती. या चार बाळांपैकी दोन बाळं ही जुळी, पहिले बाळ हे १.४०० ग्रॅम व दुसरे बाळ १.३०० ग्रॅम वजनाचे होते. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होता. त्या बाळांना व्हेंटिलेटर लागत होते. तब्बल एक महिना आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर ते बरे झाले. तिसरे बाळ हे वेळेच्या आधीच जन्मल्यामुळे १.१०० ग्रॅम वजनाचे होते. हे बाळ दापोली
तालुक्यातील टेटवली येथील होते. ते देखील अतिशय कमी वजनाचे होते. त्यालाही श्वासोच्छवासाचा त्रास होता. त्यामुळे या बाळाला कृत्रिम श्वास द्यावा लागत होता व पेटीत ठेवले होते. हे बाळ पंधरा दिवसांनी बरे झाले. चौथ्या बाळाला श्वासाचा त्रास होता; परंतु ते पूर्ण आठवडे झाल्यानंतर जन्मले असूनही दुसऱ्या हॉस्पिटलमधून आपल्याकडे पाठवण्यात आले. त्यावेळी बाळाला जास्त प्रमाणात आकडी येत होती. तसेच श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. त्यांचे जन्मावेळी वजन २.५६८ इतके होते. त्यामुळे व्हेंटिलेटर लागत होते. या चारही वाळांवर औषधोपचार करुन सुखरूप घरी पाठवण्यात आले.

या बाळांचे उपचार बालरोग तज्ज्ञ डॉ. अनिल कुरणे, डॉ. पार्वती हळबे व डॉ. अंकिता सुर्वे तसेच बालरोग विभागातील सहकारी डॉक्टर्स सलोनी, पंक्ती यांनी केले. तसेच या बाळांची शुश्रूषा करणाऱ्या एनआयसीयूच्या नर्सेस वृषाली, संपदा, सोनाली, प्राची, प्रज्ञा, श्रृतिका, शीतल, जान्हवी, आकांक्षा, साक्षी, नीलम, ऐश्वर्या यांनीही योग्य ती काळजी घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 05/Sep/2025