साडवली : आईटीसी रत्नागिरी ऑरगॅनिक फार्मर ग्रुपच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने विद्यामंदिर येथील सभागृहात शाश्वत आंबा उत्पादन कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेला ताम्हाने पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला सदर कंपनी कोणकोणत्या विषयावर काम करते याची माहिती देण्यात आली. तसेच प्रथम शेतीमधील अडचणी व नवीन तंत्रज्ञान याचा अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला कंपनीचे बिझनेस मॅनेजर शैलेंद्र जाधव यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. या कार्यशाळेला आंध्रप्रदेश वरून आलेल्या ऑरगॅनिक प्रोग्राम मॅनेजर चैतन्या भवानी यांनी विविध राज्यातील शेतीविषयक आपले अनुभव सांगत कोकणातील शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेतीत काम केले पाहिजे हे सांगितले. तर पुढील पिढीने करिअर म्हणून शेतीकडे पाहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
कोकण कृषी विद्यापीठ सेंद्रिय शेती मार्गदर्शक डॉ. संदीप कांबळे (बारामती) यांनी विषमुक्त आंबा शेतीसाठी सर्वोत्तम पद्धत यावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, सेंद्रिय पद्धतीने शेती वा लागवड करताना प्रथम त्याची लागवडीची पद्धत समजून घेतली पाहिजे.
त्यानंतर त्याची मशागत व इतर व्यवस्थापन समजून घेतले पाहिजे. पर्यावरणातील प्रत्येक सजीवाचे आपल्याशी वेगळे असे नाते आहे ते समजून घेतले पाहिजे असेही कांबळे म्हणाले. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले बायो फर्टिलोयझर्स रतन काळे यांनी बायो फार्म प्रॅक्टिसचे फायदे सांगितले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन महेंद्र करंबेळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी रवींद्र आंबेकर, मुरलीधर जवरत व सहकारी यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 21/Oct/2024














