maharashtra heavy rain damages: महाराष्ट्रात अतिवृष्टीने 36 लाख एकरचे नुकसान

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. आतापर्यंत 36 लाख 11 हजार 872.5 एकर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून पंचनामे होताच शेतकर्‍यांना मदत दिली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांतील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात 14 लाख 44 हजार 749 हेक्टर क्षेत्र म्हणजेच 36 लाख 11 हजार 872.5 एकर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले 12 जिल्हे आहेत. 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

बाधित झालेली पिके

सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

एकूण बाधित जिल्हे
नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी,अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : भरणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 06-09-2025