देवरुख : संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसला आहे. मागील तीन महिन्यांत २५१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे. तालुक्यात ६ हजार २५० हेक्टर भातशेतीची लागवड क्षेत्र असून, शेतकरी पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीने भातशेती करत आहे. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीला बसत असून, अवकाळी पावसामुळे पिकलेली भातशेती आडवी झाली आहे. जंगली प्राण्यांचा होणारा त्रास आणि अवकाळी पाऊस यामुळे भातशेतीच्या लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यातच शेतीसाठी मनुष्यबळही मिळत नाही तर आधुनिक यंत्रसामुग्री घेणे परवडत नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र घटत आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे नुकसान होत आहे. दिवसा कधीही पाऊस कोसळत असल्याने भातशेती तयार झाली असतानाच कापणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
यंदा जुलै महिन्यात १७९ तर ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये ७२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.
कृषी विभागाकडे संपर्क साधावा
सध्या तालुक्यात भात कापणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भात कापणी करत असताना भात भिजले असता आणि नुकसान झाले असता शेतकऱ्यांनी त्वरित तालुका कृषी विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 21/Oct/2024














