Ratnagiri : जिल्ह्यात 36 हजार 566 गणपतींना निरोप

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत फटाक्यांची आतषबाजी, गुलाल, गुलाबपुष्पांची उधळण करीत, ढोल, ताशांच्या गजरात वाजत गाजत रत्नागिरी जिल्ह्यातील 36 हजार 566 घरगुती, 61 सार्वजनिक गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मांडवी, मिर्‍या बंदर, भाट्ये किनार्‍यासह तालुक्यातील नद्या, तलावात, कृत्रीम विसर्जन कुंडात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी गणेशभक्तांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप देतेवेळी केली. मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिनी सांगता झाली. सकाळपासूनच शहरासह तालुक्यातील घरगुती गणपती विसर्जनाचा उत्साह पहावयास मिळाला. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भक्तांचा मोठा उत्साह दिसून आला. ढोल ताशांच्या गजरात, बॅण्डबाजासह वाजत-गाजत आणि भक्तीगीतांच्या तालावर भाविकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वच समुद्र किनारे, नद्या अशा ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. दुपारपासूनच गणेशमूर्ती विसर्जनासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या. यावेळी पालखी, रथ आणि सजवलेल्या वाहनांतून बाप्पाची जंगी मिरवणुक काढण्यात आली. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक पध्दतीने मिरवणुक काढली. ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम, नृत्यविष्कारांनी संपूर्ण वातावरण गणेशमय झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 08-09-2025