Ratnagiri: दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टोबरला जल फाऊंडेशनकडून उपोषण

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी जल फाउंडेशन कोकण विभाग संस्थेने मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

येत्या २ ऑक्टोबर रोजी हे उपोषण होणार असल्याचे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी सांगितले.

१९९६ पासून सुरू असलेली आणि मार्च २०२० मध्ये करोनाच्या काळात बंद करण्यात आलेली ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत दादरपर्यंत चालवण्याची प्रमुख मागणी आहे. या गाडीमुळे कोकणातील प्रवाशांना मुंबईपर्यंत थेट प्रवास करणे सोपे होते. मुंबई आणि चिपळूणदरम्यान एक नवीन दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गाडीमध्ये द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार आणि सामान्य अनारक्षित डबे असावेत. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड आणि अंजनी अशा अनेक महत्त्वाच्या थांब्यांवर थांबवावी. प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी मुंबईतून पहाटे लवकर सुटून चिपळूणहून दुपारी किंवा सायंकाळी परत फिरावी अशी मागणी करण्यात आली आहे. ‘नमो भारत’ किंवा ‘वंदे मेट्रो’सारख्या आधुनिक रेल्वेने ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा मोठा फायदा होईल असेही सूचित करण्यात आले आहे.

​गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ‘जल फाउंडेशन’ सातत्याने मध्य रेल्वेकडे या मागण्यांचा पाठपुरावा करत आहे. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने उपोषणाचा मार्ग निवडण्यात आल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 08-09-2025