Ratnagiri: भरकटलेला बार्ज दोन महिन्यानंतरही जैसे थे!

Ratnagiri, पावस : गोव्यावरून बेलापूरला निघालेले बार्ज तांत्रिक अडचणीमुळे भरकटला आणि तो रनपार बंदरात विसावला होता. परंतु दोन महिने उलटले तरी तो अजून त्याच ठिकाणी आहे.

दोन महिन्यापूर्वी बार्ज, टग व छोटी होडी गोव्यावरून बेलापूरला समुद्रमार्गे निघाली होती. परंतु त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा बाज भरकटला आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने रनपार बंदरात विसावला होता. याची माहिती मिळाल्यावर तातडीने पूर्णगड सागरी पोलिस ठाणे, कस्टमचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित मालकाशी संपर्क केला. त्यावेळी तांत्रिक अडचणीमुळे बार्ज भरकटल्याचे निदर्शनास आले. या बार्जची तपासणी करण्यात आली आणि कोणताही अनिश्चित प्रकार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी बार्जमध्ये दहा ते बारा खलाशी होते. त्यानंतर मालकांनी येऊन त्याच्या दुरुस्ती संदर्भात हालचाली सुरू केल्या. परंतु दोन महिने झाले तरी अद्याप मालकाने हे बार्ज नेलेले नाही.

यासंदर्भात पोलिस अंमलदार महेश मुरकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, सुरुवातीपासून आमचे सागरी पोलिस ठाणे यावर विशेष लक्ष ठेवून आहे. त्या बार्जमध्ये कोणतेही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून न आल्यामुळे परिसरामध्ये गस्त सुरू आहे. संबंधित बार्जचे मालक तांत्रिक अडचणी दूर करून ते घेऊन जाईल अशी शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 09-09-2025