रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेच्या सलग ३०६ व्या मासिक संगीत सभेत सूरमणी भाग्यश्री देशपांडे यांच्या दमदार गायनाने रंगत आणली.
कै. शामराव भिडे स्मृती मासिक संगीत सभा म्हणून ही संगीत सभा सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात पार पडली. कार्यक्रमात मुंबईच्या प्रसिद्ध गायिका सूरमणी भाग्यश्री देशपांडे यांच्या शास्त्रीय ख्याल गायनाबरोबरच अभंग आणि नाट्यसंगीत गायनाचे दमदार सादरीकरण झाले.
सुरवातीला रत्नागिरीचे प्रसिद्ध गायक आनंद पाटणकर यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन होऊन श्रीफळ वाढविले गेले. संगीतअलंकार आणि एमए ( म्युझिक) पदव्या प्राप्त केलेल्या तसेच आकाशवाणीची बी (हाय) ग्रेड प्राप्त असलेल्या भाग्यश्री देशपांडे यांनी आपल्या मैफलीची सुरवात पूरिया कल्याण रागातील आज सु बना या बडा ख्यालाने केली. याला जोडून आलिरी मैं कैसे जाऊ अब घर ही द्रुत तालातील बंदिश सादर केली. लहानपणापासून आईंवडिलांनी करवून घेतलेला रोजचा ९-९ तासांचा रियाज आणि त्यामुळे लहानपणीच गळ्यावर झालेले स्वरांचे शुद्ध संस्कार, पुढे मोठमोठ्या गुरुजनांकडे घेतलेली पक्की तालीम याचा पुरेपूर प्रत्यय भाग्यश्रीताईंच्या गायनात दिसून आला. स्वरांवर प्रचंड हुकमत, सफाईदार आणि दमदार आलाप, ताना व सरगम यामधील तितकेच माधुर्ययुक्त निरागस सूर, यामुळे श्रोते स्वरसागरात सुरवातीपासूनच न्हाऊन निघाले. त्यानंतर त्यांनी हे सुरांनो चंद्र व्हा, नयने लाजवित ही नाट्यपदे व याला जोडून एक गवळण, पद्मनाभा नारायणा हा अभंग आणि शेवटी भैरवीतील ठुमरीने आपल्या मैफलीचा शेवट केला.
मैफलीला दमदार आणि उठावदार साथसंगत हेरंब जोगळेकर (तबला), चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) आणि कु. पायल पाटील (तालवाद्य) यांनी केली. या दिवशी संस्थेचा २७ वा वर्धापन दिन असल्यामुळे श्री सत्यनारायण पूजा झाली. सर्व श्रोत्यांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी जांभेकर विद्यालय, किरण बापट (पुणे), दिलीप केळकर, संजू बर्वे इत्यादींची सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 21-10-2024









