रत्नागिरी : “बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नाही तर उत्पन्न वाढवण्याचा आणि उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे. येत्या १७ सप्टेंबरला महाराष्ट्राची पहिली “बांबू पॉलिसी” राज्य सरकारतर्फे जाहीर होत आहे, ही आनंदाची बाब आहे. योग्य नियोजनाने आणि शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ३० ते ४० हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याची ताकद आहे,” असे विधान राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बांबू परिषद व शेतकरी मेळावा कार्यक्रमात राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवड करण्याचा संकल्प केला आहे. बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, अगदी मेथेनॉल उत्पादनापर्यंत विविध उद्योग उभे राहू शकतात. विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमध्ये ५० टक्के फर्निचर बांबूचे असणार आहे, हा कोकणातील शेतकऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण असेल.”
ही परिषद म्हणजे फक्त चर्चा नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनवण्याचा संकल्प पालकमंत्री सामंत यांनी शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत केला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि विशेषतः मोठ्या संख्येने हजेरी लावणाऱ्या शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
याप्रसंगी या मंडळाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह व्यासपीठावरील सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 09/Sep/2025














