Chiplun : जलवाहिनी फुटून पेढेत लाखोंचे नुकसान

चिपळूण : शहरालगतच्या पेढे येथे सोमवारी अचानक एमआयडीसीला रात्री मुंबई-गोवा महामार्गालगत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. यामध्ये मोठा आवाज होऊन पाण्याचा मोठा फवारा उडाला आणि पेढे येथील रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले. यामध्ये सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले आहे. लोटे एमआयडीसीकडे पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यात येते. अनेकवेळा ही पाईपलाईन फुटत असते. यामुळे येथील घरे, दुकाने व शेतीचे नुकसान होत असते. पाईपलाईन फुटल्याने रात्रीच मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले व मोठे कारंजे महामार्गालगत उडताना दिसते. येथील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील माल व साहित्य भिजून नुकसान झाले आहे. सातत्याने असा प्रकार घडत असून एमआयडीसीला कायमस्वरूपी उपाय करता आलेला नाही. त्यामुळे येथील दुकानदार व ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

यामध्ये पेढे फरशी येथील नरेंद्र माळी यांच्या दुकानाला या पाण्याचा मोठा फटका बसला. पाण्याचे प्रेशर मोठे असल्याने अनेक दगड-गोटे थेट महामार्गावर उडाले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पाणीपुरवठा बंद करण्यात आला; मात्र तोपर्यंत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

या घटनेमुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. येथील दुकानदार नरेंद्र माळी यांचे साडेसहा लाख, राकेश गडदे यांचे २ लाखांचे तर राजेश गडदे, स्मित गांधी, साहील गांधी, महेश शिंदे व अन्य काही व्यापाऱ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तलाठ्यांमार्फत नुकसानग्रस्त दुकानांचे मंगळवारी पंचनामे करण्यात आले. हे नुकसान ८ लाखांच्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. एमआयडीसीने ही नुकसानभरपाई भरून द्यावी, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, आज (दि.९) दुपारपासून या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी फुटलेल्या पाईपचे लिकेज काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 10/Sep/2025