रत्नागिरीत ओला शोरूममध्ये ग्राहकांचा राडा! गाडी पळवली, टीव्ही-लॅपटॉप नेण्याचा प्रयत्न; शोरूम पुन्हा बंद करण्याचा इशारा

रत्नागिरी: शहरातील नाचणे येथील बहुप्रतिक्षित ओला शोरूम सुरू होताच ग्राहकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील अनेक महिन्यांच्या मनस्तापानंतर दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना, काही आक्रमक ग्राहकांनी शोरूममध्ये घुसून कर्मचाऱ्यांना अरेरावी केली. इतकेच नव्हे तर, एका ग्राहकाने थेट एक गाडीच उचलून नेली, तर काहींनी टीव्ही-लॅपटॉप पळवण्याचा प्रयत्न केला. एका ग्राहकाने तर पेट्रोल आणून शोरूम पेटवून देण्याची धमकी दिल्याने येथील कर्मचारी प्रचंड दहशतीखाली आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास शोरूम पुन्हा कायमचे बंद करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

महिनोंच्या त्रासानंतर सुरू झाले होते शोरूम

मागील काही महिन्यांपासून ट्रेड सर्टिफिकेटच्या तांत्रिक अडचणीमुळे आरटीओने (RTO) नाचणे येथील ओला शोरूम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे रत्नागिरीतील सुमारे दोन हजार ओला ग्राहकांचे प्रचंड हाल झाले. सेवेअभावी अनेक ग्राहकांनी आपल्या बंद पडलेल्या गाड्या शोरूमच्या बाहेर आणून टाकल्या होत्या. अखेर स्थानिक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी ट्रेड सर्टिफिकेटची अडचण दूर झाली आणि ग्राहकांना सेवा मिळावी यासाठी शोरूम पुन्हा सुरू करण्यात आले.

शोरूम उघडताच ग्राहकांचा संतापाचा ‘थर्ड डिग्री’

शोरूम सुरू झाल्याची बातमी कळताच अनेक त्रस्त ग्राहक येथे पोहोचले. मात्र, काहींनी संयम न बाळगता आक्रमक पवित्रा घेतला.

  • * शोरूममधील कर्मचाऱ्यांना अरेरावी करण्यात आली.
  • * एका संतप्त ग्राहकाने कोणतीही विचारपूस न करता शोरूममधील एक गाडी उचलून नेली.
  • * दुसऱ्या एका ग्राहकाने शोरूममधील टीव्ही उचलून नेण्याचा प्रयत्न केला.
  • * एका ग्राहकाने लॅपटॉप नेण्याचा प्रयत्न केला.
  • * सर्वात धक्कादायक म्हणजे, एका ग्राहकाने पेट्रोल आणून संपूर्ण शोरूम जाळून टाकण्याची धमकी दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कर्मचारी भयभीत, सहकार्याचे आवाहन

ग्राहकांच्या या अनपेक्षित दादागिरी आणि आक्रमकतेमुळे स्थानिक कर्मचारी प्रचंड घाबरले आहेत. “आम्ही ग्राहकांची अडचण समजतो, पण अशाप्रकारे जीवघेणी धमकी आणि सामानाची लूट सहन केली जाणार नाही. जर ग्राहकांनी संयम बाळगून आम्हाला सहकार्य केले, तरच आम्ही सेवा देऊ शकू. अन्यथा, सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला हे शोरूम पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ओला कंपनी रत्नागिरीत दरमहा सरासरी ४५ गाड्यांची विक्री करत होती आणि शहरात दोन हजारांहून अधिक ग्राहक आहेत. आता या ग्राहकांच्या सहकार्यावरच शोरूमचे भवितव्य अवलंबून आहे.