रत्नागिरी : निवळी-कोकजेवठार येथे टोलनाका होणार

रत्नागिरी : गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील कोंटे ते वाकेड या आठव्या टप्प्यातील कामाला वेग आला आहे. या टप्प्यात येणाऱ्या निवळी कोकजेवठार येथील रूंदीकरणास सुरुवात झाली आहे. याच परिसरात टोलनाका होणार असून, त्याचे कामही सुरू आहे; मात्र याच टप्प्यातील हातखंबा जंक्शनच्या आराखड्यासच अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने तळेकांटे ते वाकेड या आठव्या टप्प्यातील काम रखडण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक वर्ष रखडलेले सातव्या व आठव्या टप्प्यातील काम हा चर्चेचा विषय बनत आहे. अनेकवेळा आराखड्याअभावी कंत्राटदार बदलूनही काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच या सर्वच कामाचा तपशील केंद्र शासनाच्या रस्ते आणि परिवहन विभागाला सादर करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी कोकजेवठार येथे टोलनाका आहे. रूंदीकरणासोबतच आता टोलनाक्याच्या कामासाठी जागा रुंद करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच येथे टोलनाका उभारणीचे काम सुरू होईल. सध्या मुंबई-गोवा महामागांच्या चौपदरीकरणासोबत मिऱ्या-नागपूर महामार्गाचे कामही सुरू आहे. हे दोन्ही महामार्ग तालुक्यातील हातखंबा येथे एकत्र येणार आहेत. त्यामुळे येथे महामार्गाचे जंक्शन उभारण्यात येणार आहे; मात्र याच गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुलाचेही काम होणार आहे; मात्र अद्याप या दोन्ही कामांच्या आराखड्यास मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे जंक्शनअभावी या टप्प्यातील कामही रखडणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 21/Oct/2024