लांजा : तालुक्यातील भडे गावातील देऊळवाडी येथे पारंपरिक शेतकरी असलेले ग्रामस्थ प्रवीण गजानन तेंडुलकर यांच्या घराशेजारी शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी वीज पडली. या घटनेत नारळ, पोफळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे. भडे गावातील देऊळवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता आणि विजांचा कडकडाटही सुरू होता. त्या वेळीच शेतकरी प्रवीण तेंडुलकर यांच्या घरालगत असणाऱ्या नारळ, पोकळीच्या बागेवर वीज पडली. यामध्ये २० वर्षापेक्षा अधिक कालावधीमध्ये लावलेले आणि विशेष जोपासना केलेले १० पेक्षा अधिक नारळ झाडे व पोकळीच्या १५ पेक्षा अधिक झाडांना विजेचा धक्का लागून ती जळून गेली आहेत. या संदर्भात तेंडुलकर यांनी सांगितले, नारळ आणि काजू बागेत याशिवाय अनेक झाडांना धक्का बसला असून, वीज पडून सुमारे लाखभर रुपयाचे नुकसान झाले आहे. तहसीलदार प्रियांका ढोले यांनी घटनेची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 21/Oct/2024









