Yogesh Kadam | समृद्ध पंचायतराज अभियानात ‘दापोली’ सरस व्हावी : मंत्री योगेश कदम

दापोली : समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे दापोली मतदारसंघाने मिळवावीत, अशी अपेक्षा या वेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली.

ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दापोली-मंडणगड व खेड तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन दापोली येथे करण्यात आले. सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या वेळी कदम म्हणाले, लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा आहे. राज्यभरातील तालुकास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय पातळीवर तब्बल ३०० कोटी रुपयांची बक्षिसे वितरित होणार आहेत. आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी ठोस नियोजन करून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मिळवावीत यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत.

१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबवले जाणार असून, या काळात प्रत्येक ग्रामपंचायत हो गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाली पाहिजे. स्वच्छता, पाणीपुरवठा, शाश्वत विकास, डिजिटल ग्रामपंचायत, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केल्यास ग्रामपंचायतीना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनपर बक्षिसे मिळणार आहेत.

या माध्यमातून गावोगाव विकासाची नवी चळवळ उभी राहील. या कार्यशाळेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक व सुनील खरात, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई व दीप्ती निखारगे, शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील शेकडो सरपंच व ग्रामसेवक यांची उपस्थितीही लक्षणीय होती. या कार्यशाळेमुळे ग्रामविकासाला एक नवे दिशादर्शन मिळाले असून, आगामी तीन महिन्यांत मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये बक्षिसे मिळवण्यासाठी सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

पायाभूत सुविधा मजबूत होतील
ग्रामपंचायतींनी आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या योजनांची अंमलबजावणी कशी करावी याबाबत दिशा दाखवण्यात आली. या अभियानातून गावागावांतील पायाभूत सुविधा मजबूत होऊन नागरिकांना थेट लाभ मिळेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 11/Sep/2025