रत्नागिरी : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शरीर मिळावे आणि त्यातून उत्तम डॉक्टर घडून समाजाची सेवा व्हावी, या उदात्त हेतूने रत्नागिरीतील सुबोध कुंटे यांनी आपल्या आई, कै. सुप्रिया श्रीपाद कुंटे (वय ८०) यांचे देहदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे झालेले हे ११ वे देहदान ठरले असून, कुंटे कुटुंबीयांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मालगुंड येथील नविंद्रनगर येथे राहणाऱ्या कै. सुप्रिया कुंटे यांचे बुधवारी, १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास परकार हॉस्पिटलमध्ये निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर तिच्या देहाचा उपयोग समाजासाठी व्हावा, या तिच्याच इच्छेचा मान ठेवत मुलगा सुबोध कुंटे यांनी देहदानाचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
आज, गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कठीण प्रसंगी सुबोध कुंटे यांचे मित्र सागर भिंगारे, रोहित पवार, अमित पाटील, आणि ओमकार खेऊर यांनी त्यांना मोलाची साथ देत सामाजिक बांधिलकी जपली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. यावेळी शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, वाहनचालक विनोद मोहिते, सौरभ जाधव आणि वृंदारक पेजे यांनी परिश्रम घेतले.
या देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्राचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी मोठी मदत होणार असून, देहदानाच्या या चळवळीला आणखी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 11-09-2025









