संगमेश्वर : सोनवी पुलाच्या गर्डरचे काम अखेर सुरू…

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलाच्या गर्डरचे काम अखेर सुरू झाले आहे. बाजारपेठेकडील बाजूने पिलर्स उभारणीचे काम सुरू आहे.

आरवली ते बावनदीदरम्यान १२ छोटे-मोठे पूल आहेत. वांद्रीजवळ सप्तलिंगी येथे सहा वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलांच्या कामांचा प्रारंभ झाला; मात्र त्यानंतर वर्षभरातच या पुलासह अन्य पुलांची कामे सलग पाच वर्षे रखडली. सुस्त ठेकेदार, पाठपुराव्याचा अभाव, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सोशिक जनता यामुळे आरवली ते बावनदी या अतिअपघातप्रवण क्षेत्रातील काम प्राधान्याने होणे आवश्यक होते; मात्र हेच काम रखडले. ज्या क्षेत्रात आजवर सर्वाधिक अपघात झाले त्याच ठिकाणी ठेकेदाराने अर्धवट स्थितीत कामे करून ठेवली आहेत.

पाच वर्षांनंतर रखडलेल्या १२ पुलांची कामे मंदगतीने का होईना सुरू झाली. यामध्ये सप्तलिंगी, कोळंबे शास्त्रीपूल, गडनदी पूल यांचा समावेश आहे. संगमेश्वर येथील प्रसिद्ध सोनावी पुलाबाबत मात्र बरेच दिवस निर्णय होत नव्हता. या पुलाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल अवजड वाहने जाताना हलतो. पावसाळ्यात या पुलाचे काम थांबविण्यात आले होते ते आता सुरू झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 21/Oct/2024