रत्नागिरी : कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदर हे एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित केले जाणार आहे. तेथून राज्याच्या अन्य भागाशी जोणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचीही जोड दिली जाईल.
यामुळे कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी जयगडमध्ये केले.
जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह राणे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, मत्स्यव्यवसाय, बंदर विभाग, कृषी, अपेडा, मित्रा या संस्थांचे प्रतिनिधी आणि कोकण रेल्वेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक जयगडमध्ये घेतली. बैठकीनंतर त्यांनी याबद्दल माहिती दिली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जयगड बंदराचा विकास कसा करता येईल, यावर बैठकीत सखोल चर्चा झाली. आंबा, काजू आणि मत्स्योत्पादनांच्या निर्यातीसाठी एक सक्षम केंद्र म्हणून जयगड बंदराचा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या या उत्पादनांची निर्यात मुख्यतः उरणच्या जेएनपीए बंदरातून होते; मात्र त्यामुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून जयगड बंदर हा जेएनपीएला एक सक्षम पर्याय म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. या बंदराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सवलती आणि मदतीबाबतही बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती राणे यांनी दिली.
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग होण्यासाठी खासदार नारायण राणे सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचेही राणे यांनी सांगितले. हा रेल्वेमार्ग झाल्यास कोकणचा विकास अधिक वेगाने होईल आणि जयगड बंदराला त्याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे त्याचा अधिक पाठपुरावा केला जाईल, असेही नीतेश राणे म्हणाले. विविध तालुके जलमार्गाने कसे जोडले जातील, याचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळ तयार करत असल्याचे राणे यांनी सांगितले.
जेएसडब्ल्यू ही देशातील एक मोठी आणि महत्त्वाची कंपनी असून, बंदरविकासासाठी त्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे राणे यांनी नमूद केले. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यात येईल. या बैठकीचा उद्देश केवळ बंदराचा विकास नसून, परिसरातले शेतकरी आणि नागरिकांचे जीवनमान व आर्थिक क्षमता उंचावणे हा होता. उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवण्यावर आणि वाहतुकीचे अंतर कमी करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. या सर्व प्रयत्नांमुळे कोकणातील व्यवसाय आणि व्यापाराला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडतील, असे प्रतिपादन राणे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 12-09-2025














