रत्नागिरी : रत्नागिरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शासकीय नवीन निवासस्थाने बांधण्याच्या प्रकल्पाला गृहविभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल १४ कोटी ७५ लाख १२ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ३३ निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.
रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे हा प्रकल्प साकारला जाणार आहे. यासाठी शासकीय जमीन निश्चित करण्यात आली आहे, जी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ३३ निवासस्थाने बांधली जातील, जी विविध प्रकारांमध्ये विभागली जातील, यात दोन इमारतीमध्ये २० निवासस्थाने, एका इमारतीत १२ निवासस्थाने तसेच तळमजला असलेले एक निवासस्थान यांचा समावेश असेल. ही सर्व निवासस्थाने तळमजला अधिक तीनमजले या रचनेत असणार आहेत.
प्रकल्पाचा अंदाजित खर्च १४ कोटी ७५ लाख ११ हजार ७१७ रुपये आहे. यामध्ये केवळ इमारतींचे बांधकामच नाही तर सर्व आवश्यक पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. यामध्ये पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, अंतर्गत आणि बाह्यविद्युतीकरण तसेच अग्निशमन व्यवस्थेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, कंपाउंड वॉल, अंतर्गत रस्ते, पार्किंगची सोय, लँडस्केपिंग, माती परीक्षण आणि गटार बांधकामासारख्या कामांसाठीही भरीव निधी नियोजित आहे. विशेष म्हणजे, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन भुयारी पाण्याची टाकी, लिफ्ट, एअर कंडिशनिंग आणि सीसीटीव्ही प्रणाली बसवण्याचीही तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी खासगी निवासस्थानात राहतात. या प्रकल्पामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना हक्काची शासकीय निवासस्थाने मिळणार आहेत. अनेक वर्षांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे- कीर्ती शेडगे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 12/Sep/2025













