रत्नागिरी : संकष्टीला गणपतीपुळ्यात १८ हजार भक्तांची उपस्थिती

गणपतीपुळे : शनिवार, रविवार जोडून सुट्ट्या आल्यामुळे दि. २० रोजी संकष्टी चतुर्थीदिवशी प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुण्यासह गोवा, कर्नाटक येथीलही पर्यटक दर्शनासाठी उपस्थित होते. दोन दिवसात सुमारे १८ हजार पर्यटकांनी श्रींचे दर्शन घेतल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तसेच पर्यटन हंगामाची चाहूल लागल्यामुळे येथील व्यावसायिकही सुखावले आहेत.

शनिवारी (ता. १९) सुट्टी असल्यामुळे अनेकांनी सायंकाळी गणपतीपुळेत हजेरी लावली. ही सुट्टी लॉजिंग व्यावसायिकांच्या पथ्थावर पडली. परजिल्ह्यासह परराज्यातून आलेले भक्तगण गणपतीपुळेत मुक्कामाला होते. संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरातील श्रींची मूर्ती सजवण्यात आली. पहाटे साडेपाच वाजता पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरवात झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी मंदिरात गर्दी होती. दिवसभर वातावरण कोरडे असल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह होता. सायंकाळी ४.३० वाजता प्रदक्षिणेसाठी पालखी बाहेर काढण्यात आली. देवस्थानचे सरपंच, मुख्य पूजारी यांच्यासह सर्वचजणं सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत भक्तगण दर्शन घेत होते. शनिवारी दिवसभरात सुमारे ६ हजार तर रविवारी सुमारे १२ हजार पर्यटकांनी दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर पर्यटक फिरण्यासाठी किनाऱ्यावर जात होते. त्यामुळे किनाऱ्यावरील विक्रेत्यांचा फायदा झाला. मात्र सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर सुमारे अर्धा तास होता. त्यानंतर पुन्हा वातावरण निवळले. परंतू ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट काही काळ सुरू होता. त्यामुळे किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी कमी झाली होती. दिवसभरात पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यांने व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते.

पर्यटन हंगामाची चाहूल
शाळा, महाविद्यालयांच्या सहामाही परीक्षा सुरू असून २७ ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्टीला सुरवात होणार आहे. हा कालावधी पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. यावेळी मोठ्याप्रमाणात पर्यटक गणपतीपुळेत येतात. या हंगामाची चाहूल संकष्टी चतुर्थीदिवशी लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 21-10-2024