रत्नागिरी : गणेशोत्सव हा फक्त धार्मिक वा सांस्कृतिक सोहळा नसून, तो ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाला नवचैतन्य देणारा उत्सव आहे. जिल्ह्यातील गावांमध्येही यंदा गणेशोत्सवाच्या काळात घराघरात चैतन्य पसरले. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये नोकरी-उद्योग करणारे भूमिपुत्र मोठ्या उत्साहाने गावी परतले. परिणामी गावं फुलून गेली, बाजारपेठा गजबजल्या, मंदिरे आणि वाड्या आनंदाने न्हाल्या. मात्र, गणपती विसर्जनानंतर चित्र पूर्ण बदलले. उत्सवानंतर पुन्हा घरं ओसाड झाली, रस्त्यांवरची गर्दी विरळली आणि गावात एक प्रकारची शांतता पसरली. मोठ्या उत्साहाने परतलेले भूमिपुत्र पुन्हा नोकरी वा उदरनिर्वाहासाठी शहरांकडे रवाना झाले. त्यामुळे अनेक गावे आणि वाड्यांत फक्त वयोवृद्ध आणि महिलांची उपस्थिती जाणवू लागली.
गणेशोत्सव काळात गावात मिळणारे छोटे-मोठे रोजगार, उत्सवाचे खर्च आणि आप्तेष्टांच्या भेटी यामुळे गावाची अर्थचक्र गतीमान होते. स्थानिक दुकानदार, फळ-भाजी विक्रेते, वाहतूकदार आणि कारागीर यांच्या हाताला चांगले काम मिळते. पण हा काळ संपताच पुन्हा गावात संधींचा अभाव जाणवू लागतो. एकच गोष्ट ही परिस्थिती बदलू शकते यासाठी तीन मुख्य विषय आहेत ते म्हणजे शेती, हापूस आंबा, काजू, चिकू, रातांबे, करवंद, जांभळ, फणस, नारळ, सुपारी म्हणजे फलोद्यान, शेती पूरक व्यवसाय, पर्यटन उद्योग मात्र यासाठी लागणारे पाणी म्हणजेच जलव्यवस्थापन जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी दिसून येत नाही. तसेच यासाठी लागणारा निधी शासन कोकणाला मिळूच देत नाही.
पर्यटन विकास शून्य निधी, मत्स्य विकास शून्य निधी आणि आंबा काजू हॉर्टिकल्चर शून्य निधी तीन विषयाची महामंडळे आहेत. आंबा, काजू बोर्ड कोकणसाठी पर्यटन विकास मंडळ आणि मत्स्य उद्योग मंडळ तिन्ही खात्यांसाठी कोकणासाठी निधी नाही तसेच एखादा तरुण कृषी पर्यटनकडे वळला तर येथील बँका त्यांना पतपुरवठा करण्यास तयार होत नाहीत व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत.
रत्नागिरी तालुक्यातील ही परिस्थिती ग्रामीण महाराष्ट्रातील स्थलांतराच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी आहे. बहुसंख्य युवक-युवती शहरांकडे कामाच्या शोधात स्थायिक झालेले आहेत. गावी उत्सव, लग्नसराई किंवा एखाद्या सणाच्या निमित्तानेच त्यांची उपस्थिती दिसते. त्यामुळे गावातील शाळा, शेती आणि पारंपरिक व्यवसाय यावर मोठा परिणाम होत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, शासनाने ग्रामीण भागात उद्योगधंदे, पर्यटन व शेतीपूरक व्यवसायांना चालना दिल्यास, गावातील युवकांना रोजगार मिळून गाव कायमस्वरूपी गजबजलेले राहतील. अन्यथा, गणेशोत्सवासारख्या काही दिवसांपुर- तेच गाव उजळून निघते आणि नंतर पुन्हा ओसाड होते, हीच वस्तूस्थिती राहते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 13-09-2025














