राजापूर : कोंडयेतर्फ सौंदळ बेंद्रेवाडी येथे घरावर कोसळली वीज

राजापूर : रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट करीत पडलेल्या परतीच्या पावसामध्ये तालुक्यातील कोंडयेतर्फ सौंदळ बेंद्रेवाडी येथे घरावर वीज पडल्याची घटना सायंकाळी 4.30 वा च्या सुमारास घडली. यामध्ये घरातील रविना लवू बेंद्रे (वय 17) आणि सारिका रघुनाथ बेंद्रे (वय 45) यांच्या हाता पायांना दुखापती होऊन त्या जखमी झाल्या आहेत. तर घराच्या छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील विज जोडणीही जळून खाक झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये तालुक्यात वीज पडण्याची ही तिसरी घटना घडली आहे.

दरम्यान, वीज पडल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे (उबाठा) उपविभागप्रमुख आणि राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रसाद मोहरकर, शांताराम तळवडेकर, सरपंच मीनल तळवडेकर, आशिष लाड, संदीप शिवगण, प्रशांत राऊत, सूर्यकांत साळवी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून आपद्वस्तना ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

मागील काही दिवसांपासून विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामध्ये गत आठवड्यात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान झाले आहे. तर दोन दिवसांपूवी हातीवले आरेकरवाडी परिसरात वीज पडल्याची घटना घडली होती. अशातच आज सायंकाळी 4.30 वा च्या दरम्यान कोंडयेतर्फ सौंदल येथे बेंद्रे यांच्या घरावर वीज पडल्याची घटना घडली आहे. घराच्या मागच्या पडविच्या छपरातून वीज घरामध्ये आली वीज पडली तेव्हा त्याठिकाणी असलेल्या दोघींच्या हाता पायांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. दरम्यान, वीज पडून अपघातग्रस्त बेंद्रे यांच्या घराच्या झालेल्या नुकसानीचा तलाठी श्री पिराई यांनी यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. तर, राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री उबाळे आणि सहकारी पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी, अपघातग्रस्तची यावेळी भेट घेतली. तालुक्यामध्ये यावर्षी परतीचा पाऊस सुरू असताना गेल्या आठ दहा दिवसांमध्ये तीसऱ्यांदा वीज पडून नुकसान झाल्याची घटना घडल्याने लोकांमध्ये काहिसे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 21/Oct/2024