How To Apply TET Exam 2025 Know Full Details : शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) 2025 परीक्षा येत्या 23 नोव्हेंबरला होणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज, सोमवार, 15 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि इतर आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे.
परीक्षेचे स्वरूप आणि पात्रता
टीईटी परीक्षेअंतर्गत दोन पेपर घेतले जातात:
- पेपर एक: हा पेपर इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी असतो.
- पेपर दोन: हा पेपर इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी असतो.
राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
टीईटी 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. तुम्ही https://mahatet.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.
- ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात: १५ सप्टेंबर २०२५ (सोमवार)
- ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ३ ऑक्टोबर २०२५
- प्रवेशपत्र (Admit Card) ऑनलाइन उपलब्ध: १० ते २४ नोव्हेंबर २०२५
टीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात काही प्रशासकीय कारणांमुळे बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परीक्षार्थींनी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासत राहावे.
परीक्षेचे वेळापत्रक
परीक्षा तारीख: २३ नोव्हेंबर २०२५
- पेपर एक: सकाळी १०:३० ते दुपारी १:००
- पेपर दोन: दुपारी २:३० ते संध्याकाळी ५:००
गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे की, टीईटी परीक्षा 2018 आणि 2019 मध्ये गैरप्रकारात सहभागी असलेल्या आणि ज्यांची संपादणूक रद्द करण्यात आली आहे, अशा विद्यार्थ्यांना टीईटी 2025 साठी अर्ज करता येणार नाही.
जर गैरप्रकाराच्या यादीत नाव असूनही एखाद्या विद्यार्थ्याने खोटी किंवा चुकीची माहिती देऊन अर्ज भरला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापासून परावृत्त व्हावे.
तर एकच परीक्षा केंद्र मिळेल!
उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अपंगत्व आणि आरक्षण श्रेणी संबंधित अचूक माहितीसाठी मूळ कागदपत्रांवर आधारित अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्ज भरताना अपलोड करण्यासाठी त्यांच्या रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्व-घोषणापत्र आणि ओळखपत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवाव्यात.
ज्या उमेदवारांना पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी दोन्ही स्तर निवडल्यास त्यांना एकच परीक्षा केंद्र मिळेल आणि त्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही परीक्षा द्यायचा विचार केला असेल तर त्यासाठी एकच अर्ज भरणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला दोन परीक्षा केंद्र मिळाले तर वेळेअभावी एका परीक्षेला मुकावे लागेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 15-09-2025














