No Shake Hands Ind vs Pak Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. मात्र टीम इंडियाने हस्तांदोलन करण्यास टाळल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेकडे निषेध नोंदवला आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंकडून हस्तांदोलन करण्यास नकार- (No Shake Hands Ind vs Pak)
आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याबद्दल पाकिस्तानने आशियाई क्रिकेट परिषदेकडे निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एका निवेदनात म्हटले आहे की, नाणेफेकीच्या वेळी कर्णधार सलमानला मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत हस्तांदोलन न करण्यास सांगितले होते. तसेच सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास टाळले. याबाबत पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने निषेध नोंदवत हे वर्तन क्रीडा भावनेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
हस्तांदोलन का टाळलं?; सूर्यकुमार यादव सांगितलं कारण-
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये सूर्यकुमार यादवने पाकच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं, याचं कारण सांगितलं आहे. आमचे सरकार आणि बीसीसीआय, आम्ही एकत्र होतो. एकत्र, आम्ही इथे आलो, आम्ही एक निर्णय घेतला आणि मला असे वाटते की, आम्ही फक्त खेळ खेळण्यासाठी इथे आलो आहोत. आणि आम्ही त्यांना (पाकिस्तानला) योग्य उत्तर दिले. आयुष्यात खेळाडूंच्या भावनेपुढे फार कमी गोष्टी असतात, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
टीम इंडियावर कारवाई होणार का?, काय सांगतो ICC आणि ACC चा नियम?
क्रिकेटच्या कोणत्याही नियमपुस्तिकेत सामना संपल्यानंतर हस्तांदोलन अनिवार्य आहे, असे लिहिलेले नाही. हस्तांदोलन हा कसलाही नियम नसून खेळभावनेचा (Sportsmanship of Cricket) भाग मानला जातो. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना भेटतात. हस्तांदोलन करण्याचा नियमच नाही, त्यामुळे टीम इंडियावर दंडाचा किंवा कारवाई प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, जाणूनबुजून प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यास, त्याला खेळभावनेच्या विरुद्ध कृती मानले जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 15-09-2025














