रत्नागिरी : खरीप हंगाम २०२५ साठी पिकांची नोंद पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्याकरिता शेतकरीस्तरावरील कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत होता. नोंदणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे शेतकरी पिकाची नोंद करण्यापासून वंचित राहू नयेत, याकरिता ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी कळवले आहे.
पीक पाहणी हा शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती स्वतः डिजिटल पद्धतीने नोंद करता येते. या प्रणालीमुळे पिकांची अचूक माहिती सरकारकडे जमा होते, ज्यामुळे शेतीविषयक योजना, पीकविमा योजना आणि इतर शासकीय अनुदानासाठी याचा उपयोग होतो. पीकविमा योजनेत सहभाग, पीक कर्ज, शासकीय भात खरेदी-विक्री व शासनाच्या इतर योजनांकरिता पीक पाहणी करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये ऑनलाईन पद्धतीने पिकांची नोंद करावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 16/Sep/2025














