रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, २ ऑक्टोबर या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत शिव-पाणंद रस्ते कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महसूल पंधरवड्यात ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, गाडीमार्ग, पायवाट, शेतरस्ता, या ग्रामीण रस्त्यांचे सीमांकन करणे यासाठी मानक पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. याअंतर्गत महसूल पंधरवड्याच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये शिव पाणंद रस्ते कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत व ग्रामस्थ आणि महसूल विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
१७ रोजी तालुक्यातील मंडळनिहाय एक एक गावांची निवड करून पाणंद रस्ते कार्यक्रमाला प्रसिद्धी, गाव शिवार फेरी, गावातील रस्त्यांची यादी तयार करणे. १८ रोजी ग्रामसभा घेऊन यादी अंतिम करणे, ग्राम ठरावासह यादी तहसीलदार यांना सादर करणे, अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करणे, १९ रोजी भूमी अभिलेख विभागाकडून गावा नकाशातील रस्त्यांबाबत आवश्यक ठिकाणी सीमांकन करणे, तहसीलदार यांनी रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत सुनावणी घेऊन आदेश पारित करणे, २० रोजी अतिक्रमण निष्कासित करणे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे. २१ रोजी भूमीअभिलेख विभागाकडून दुय्यम पुनर्विलोकन नकाशात नोंदी घेणे. ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रपत्र ३, गावा नमुना १ (फ) गावातील रस्त्यांची नोंदवही अद्यावत करणे, आदी प्रमुख कामांचा यात समावेश आहे. त्याची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 16/Sep/2025














