चिपळूण : घरडा कंपनी राष्ट्रीय स्तरावरील “उत्कृष्ठ सामाजिक योगदान आणि उत्कृष्ठ पाणी व्यवस्थापन पुरस्कार २०२४” ने सन्मानित

चिपळूण : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) मार्फत भारतामधील ज्या केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स कंपन्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे, अश्या कंपन्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने “केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्री अवॉर्ड्स” चे आयोजन केले होते. कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व (सी. एस. आर.) अंतर्गत लोटे येथील घरडा कंपनीने विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात केलेल्या उत्कृष्ट कामासाठी केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स या गटात घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे येथील कंपनीची “उत्कृष्ठ सामाजिक योगदान (सीएसआर) पुरस्कार २०२४ आणि “उत्कृष्ठ पाणी व्यवस्थापन पुरस्कार २०२४” या पुरस्कारांसाठी निवड झाली.

कंपनीने आजूबाजूच्या ग्रामीण भागात तसेच रत्नागिरी जिल्यातील खेड, चिपळूण, गुहागर आणि दापोली तालुक्यात विविध शैक्षणिक उपक्रम्, पाणी योजना, महिला सक्षमीकरण प्रकल्प, डिजिटल स्कुल प्रकल्प, विज्ञान प्रयोगशाळा, शाळा दुरुस्ती प्रकल्प, शालेय स्वछतागृह, दिव्यांग विद्यार्थी व व्यक्ती यांच्यासाठी तपासणी करून साहित्य वाटप शिबीर, शेती आणि ग्रामीण विकास प्रकल्प तसेच वृक्षारोपण व विविध पर्यावरण पूरक प्रकल्प राबविले आहेत. तसेच कंपनीमध्ये लागणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारून जास्तीत जास्त पाण्यावरती प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला आहे. या सर्व उपक्रमांचे कंपनीने राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केले होते, त्या ठिकाणी अनेक नामांकित केमिकल्स कंपन्या सामील झाल्या होत्या, घरडा कंपनीने आपल्या सामाजिक कामाने, तसेच काम करण्याच्या पारदर्शक व तंत्रशुद्ध पद्धतीने वेगळा ठसा उमटवून मानाचे पुरस्कार पटकावले, या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांतुन कंपनीने केलेल्या दृढनिश्चयाचे आणि सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे अधोरेखित होते.

या पुरस्कारांचे वितरण माननीय केंद्रीय राज्यमंत्री वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (भारत सरकार) श्रीमती डॉ. अनुप्रिया सिंग पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी मा. सेक्रेटरी केमिकल्स आणि पेट्रोकेमिकल्स विभाग (भारत सरकार), उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच या क्षेत्रातील इतर भागधारकांच्या उपस्थितीत १७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल “लीला पॅलेस” येथे करण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाल्याने कंपनीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 21/Oct/2024