Pawas : पावस बाजारपेठ मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

पावस : सतत पडणारा पाऊस व पडणारे खड्डे यामुळे पावस बाजारपेठ मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून पावसाच्या पाण्यामुळे खड्डे सापडणे मुश्किल झाले आहे. यामुळे वाहन चालकांना आपली वाहने चालवणे दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून पादचाऱ्यांनासुद्धा रस्त्यावरुन चालणे मुश्किल झाल्याने या मार्गाची दयनीय अवस्था झाली असल्याने वाहन चालक व पादचारी यांच्यामधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पावस बाजारपेठ मार्ग अरुंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्यामध्ये पाणी वाहून जाण्याकरिता गटारे नसल्यामुळे दरवर्षी या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असते. पावसाळ्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून खड्डे बुजवण्याचे काम केले जाते, परंतु हा प्रकार दरवर्षी होत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात नाराजीचा सूर निघत आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्त्याचे डांबरीकरण केले जाते, परंतु वर्षभरामध्ये पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात होते. यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला या मार्गावर काँक्रीट रस्ता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु मे महिन्यामध्ये या कामाकडे लक्ष न दिल्यामुळे यावर्षी पुन्हा खड्ड्यांचा सामना करावा लागत गणपतीच्या पूर्वसंध्येला तात्पुरती खड्ड्यांची समस्या मलमपट्टीच्या माध्यमातून करण्यात आली, परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे त्या मलमपट्टीचा काही उपयोग झाला नाही. पुन्हा मोठमोठे खड्डे पाण्याने भरल्याने खड्डा आणि पाणी यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे दुचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे हा परिसर अपघात क्षेत्र बनला आहे.

या खड्ड्यांचे साम्राज्य केव्हा संपणार व निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार, याकडे वाहन चालक व ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत. तोपर्यंत सर्वांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तरी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून होणारा त्रास कमी करण्यासाठी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन उभारावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात मंगेश भाटकर म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी या बाजारपेठ मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले, परंतु त्यानंतर दरवर्षी रस्त्यावरती खड्डे पडत असतात. त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते, परंतु त्यावरती कोणताही ठोस उपाय केला जात नाही. यासंदर्भात ग्रामपंचायतीने याकडे विशेष लक्ष देणे काळाची गरज आहे. कारण गावाच्या मध्यभागातून जाणारा हा रस्ता सर्व वाड्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वाहतूक सुखकर होण्याकरिता व खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे काळाची गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 17/Sep/2025