पेठमाप-मुरादपूर पुलाच्या कामाला पुन्हा वेग


चिपळूण : शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुककोंडीवर उत्तम पर्याय ठरणाऱ्या पेठमाप मुरादपूर पुलाच्या कामाने पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा गती घेतली आहे.

या पुलाचे काम मार्चपूर्वी जास्तीत जास्त मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पिलरवर गर्डर चढवण्याचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे.

चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर हे दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागलेले आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहोटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती. आताही काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात. परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग देखील बंद पडतो. साहजिक पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा अशी मागणी नागरिक कित्येक वर्ष करीत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर पेठमाप असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. या कामासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी १४ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर आता पावसाचा जोर कमी होताच पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. आता पुलावर गर्डर चढवण्याचे अंतिम काम सुरु आहे. हे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. गर्डरचे काम पूर्ण होताच पुलावरील उर्वरित स्लॅबचे व रेलिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. या पुलावर एकूण ६० गर्डर चढवले जाणार आहेत. आतापर्यंत ४६ गर्डर चढवण्यात आले आहेत. उर्वरित कामही तातडीने मार्गी लावले जाणार आहे.

लोकप्रतिनिधीसह नागरिकांनी या पुलाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन मूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

हा पूल सुरू झाल्यास मुरादपूर, पेठमाप, दादर मोहल्ला, बेबल मोहल्ल्यासह शहरातील बहुतांशी भाग जोडला जाणार आहे त्यांतून शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 21-10-2024