चिपळूण : गेल्या काही शहरातील खडस शॉपिंग मॉल इमारतीची मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी बुधवारी (ता. १७) पाहणी केली. या इमारतीतील गाळेधारकांच्या भेटी घेत चर्चा केली. तसेच १५ दिवसांची मुदत संपून गाळे खाली न केल्याने अखेर दोन दिवसांची मुदत दिली. या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मागवला आहे. बंदोबस्त मिळताच कोणत्याही क्षणी कारवाई करणार असल्याची सूचनाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील शिवनदीलगत उभारलेली खडस शॉपिंग मॉलची इमारत पाडण्याबाबतचे आदेश ५ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार नगरपालिकेने संबंधित इमारतीतील गाळेधारक व मालमत्ताधारकास नोटीस बजावून १५ दिवसांची मुदत दिली होती. या इमारतीच्या दर्शनी त्याबाबतचा फलकही लावला होता; मात्र प्रशासनाच्या सूचनेनंतरही संबंधित गाळेधारकांनी कोणतीच हालचाल केली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी भोसले यांनी पुन्हा या खडस शॉपिंग मॉलला भेट देऊन संबंधित गाळेधारकांशी चर्चा केली.
तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या दोन दिवसांत इमारत खाली करून द्यावी, अन्यथा पोलिस बंदोबस्तात कारवाई करावी लागेल, असा इशाराही दिला. यावेळी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, सहायक नगररचना अधिकारी नम्रता खैरमोडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, अतिक्रमण हटाव मोहिमेचे संदेश टोपरे उपस्थित होते.
मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले, न्यायालयाच्या आदेशानुसार १५ दिवसांची मुदत दिली होती; मात्र या मुदतीत इमारत खाली करण्यात आलेली नाही. संबंधित मालमत्ताधारकांनी न्यायालयात दाद मागितली असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात या आदेशाला न्यायालयाची स्थगिती किंवा अन्य निर्णय नगरपालिकेला प्रप्ति झालेला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त मागवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 18/Sep/2025










