पावस : दापोली तालुक्यातील कर्दै समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करताना चारचाकी गाडी उलटून अपघात झाल्याच्या घटनेची जिल्हा पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. असे प्रकार किनाऱ्यावर पुन्हा घडू नयेत यासाठी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किनाऱ्यांवर वाहनांना जाण्यास बंदी घातली आहे. किनाऱ्यावर जाणारे मार्ग बॅरिकेडस् लावून बंद केले आहेत.
पर्यटकांकडून समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगाने वाहन चालवून स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे गाड्या किनाऱ्यावरील वाळूत फसणे, भरतीच्या पाण्यात वाहन अडकून पडणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत. गतवर्षी दापोली तालुक्यात मुरूड, हर्णे आणि रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर असे प्रकार घडले होते. या प्रकारानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घातली आहे.
या पार्श्वभूमीवर गणेशगुळे किनाऱ्यावर सरपंच प्रसाद तोडणकर, पोलिसपाटील संतोष लाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून समुद्रकिनारी लाकडाचे ओंडके टाकून परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे पूर्णगड, गावखडी, रनपार, वायंगणी आदी परिसरातील किनारे वाहनांकरिता बंद केले आहेत. किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची वाहने नेऊ नयेत अथवा चालवू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 18/Sep/2025










