मंडणगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून शेतावर जाण्यासाठीचे रस्ते व दळणवळणाच्या सोयी देण्यासाठीचे नियोजन मंडणगड तालुक्यातील आजच्या ग्रामसभांमध्ये करण्यात आले. त्यामुळे शेतीला व्यावसायिक स्वरूप येईल आणि रोजगाराच्या शोधात शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल, अशी आशा आहे. येथील स्थलांतर रोखले तर गावांना पुन्हा संजीवनी मिळेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
मंडणगड तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीत (ता. १७) पहिल्या टप्प्यातील उपक्रमांतर्गत पाणंद रस्तेसंदर्भात विशेष ग्रामसभा झाल्या. त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावागावांतून शेतावर जाणारे रस्ते, पायवाटा, ओढ्यावरील गाडवा, मुख्य मार्ग व उपमार्गाची दुरुस्ती आणि नवे रस्ते यांची उभारणी यावर भर दिला आहे. या कामांमुळे यांत्रिकीकरण अंगिकारलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांना शेतात जाणे सोपे होणार आहे. आतापर्यंत शेतकरी पावसाळ्यामध्ये चिखलातून मार्ग काढत शेतात जात होता. शेतात पिकवलेला माल ने-आण करणे शेतकऱ्याला अवघड जात आहे. रस्त्यांमुळे दळणवळण सुधारेल आणि शेतमाल थेट बाजारपेठेत पोहोचविणे सुलभ होईल.
ग्रामविकास, शेतकऱ्यांची प्रगती व शेवटी गावांची समृद्धी हा अभियानाचा गाभा असल्याने त्याचा फायदा गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी करून घेणे आवश्यक आहे. अभियानामुळे स्थलांतर थांबून गावातच शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील- नीलेश रक्ते, अध्यक्ष तंटामुक्त समिती, पाले
सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन अभियानाची माहिती देण्यात आली. पाणंद रस्तेअंतर्गत गावांतील रस्ते. शेतशिवारात जाणारा पायमार्ग यांची नोंद घेण्यात आली असून, विकासनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निकषांप्रमाणे कायमस्वरूपी नोंद होणार असल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन अभियानांतर्गत गावचा सर्वांगीण विकास साधावा- सुनील खरात, गटविकास अधिकारी, मंडणगड
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 18/Sep/2025










