चिपळूण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या एकूण आठ वाघांपैकी पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी आणल्या जाणार आहेत. निरीक्षणाचा कालावधी संपल्यानंतर त्या चांदोली अभयारण्यात सोडल्या जातील. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम घाटात व्याघ्र पुनरुज्जीवनाचा आदर्श ठरेल, असा विश्वास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी व्यक्त केला.
ताडोबा, अंधारी, पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. मागील पाच वर्षांपासून त्याची तयारी सुरू होती. वाघांच्या पुनर्वसनाची सुरू असलेली तयारी जाणून घेण्याकरिता जगताप यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, पावसाळा संपल्यानंतर हे वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्याची प्रक्रिया सुरू होईल. वाघ पुनर्वसनाची संपूर्ण क्रियावली मागील पाच वर्षांपासून भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पहिल्या टप्प्यात चांदोली अभयारण्यामध्ये दोन मादी वाघ आणले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित सहा वाघ चांदोली आणि कोयना अभयारण्यामध्ये सोडले जातील. प्रथम दोन वाघ आणल्यानंतर त्यांना सह्याद्रीचे हवामान पोषक आहे किंवा नाही, याचा प्रथम अभ्यास केला जाईल.
त्यासाठी प्राथमिक प्रतिसाद पथक तयार केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात २७ वाघ सामावून घेण्याची क्षमता तयार केली आहे. इतर ठिकाणांचे वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणल्यानंतर त्यांच्या खाद्याची सोय करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गवताळ प्रदेश तयार केला आहे. सह्याद्रीत जागोजागी पाणवठे तयार केले आहेत. बंदिवासातील शाकाहारी प्राणी म्हणजेच सांबर, चितळ यांचे पुनर्वसन करून त्यांची संख्या वाढवली आहे.
सह्याद्रीच्या जंगलातील अधिवास सुधारला असून, व्याघ्र पुनर्स्थापनेसाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. व्याघ्र पुनर्स्थापनासाठी आवश्यक अधिवास तयार केला आहे. व्याघ्र पुनर्स्थापना, शाकाहारी प्राण्यांचे पुनर्वसन आणि लँडस्केपस्तरीय व्यवस्थापन हे धोरणात्मक काम सुरू आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम घाटात व्याघ्र पुनरुज्जीवनाचा आदर्श ठरेल, असा विश्वास आहे- किरण जगताप, उपवनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 18/Sep/2025










