आजपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी..

रत्नागिरी : राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून आज मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू होणार आहे. यावेळी अपक्ष उमेदवार किती रिंगणात उतरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा कधी होणार याची उत्सुकता सार्‍यांनाच होती. अखेरीस १५ ऑक्टोबर रोजी ही उत्सुकता संपुष्टात आली. निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानुसार आता उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सर्व पक्षात सुरू आहे. उमेदवारी कोणाला मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र उद्यापासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होणार आहे.

२२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. दाखल केलेले नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर ही तारीख निवडणूक आयोगाने दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. जिल्ह्यातील काही मतदारसंघात रस्सीखेच सुरू झाल्याने अनेकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मुहूर्त चुकणार आहेत. काहींनी तर २२ ऑक्टोबरला वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र आता हा मुहूर्त अनेकांचा चुकणार आहे. शेवटच्याक्षणी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 22/Oct/2024