maharajswa Abhiyan : लांजा तालुक्यात महाराजस्व अभियानाला प्रारंभ

लांजा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यात सेवा पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. हे अभियान १७सप्टेंबरपासून सुरु झाले असून, ते २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

हे अभियान तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. पहिला टप्यामध्ये पाणंद रस्तेविषयक मोहीम २२ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, यामध्ये शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पांदण रस्त्यांचे अभिलेख अद्यावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.

याकामी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली असून उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, उपअधिक्षक, भूमी अभिलेख, पोलीस निरीक्षक, तहसिलदार यांचा समावेश आहे. या अभियानांतर्गत प्रशासनाच्या महसूल, भूमी अभिलेख, ग्रामविकास व पोलीस विभाग यांना विभागवार कामे करण्यात येणार आहेत.

महाराजस्व अभियानांतर्गत दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे हे २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होणार असून अभियानाचा तिसरा टप्पा नावीन्यपूर्ण उपक्रम २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर यामध्ये लांजा तालुक्यातील शाळांमार्फत विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी आवश्यक दाखल्यांची प्रत पाठवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 19/Sep/2025