Kidnapping Case: देवरुखमधील सोने व्यापाऱ्याला अपहरण करून लुटले

देवरुख : शहरातील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांचे बुधवारी रात्री अपहरण करून अज्ञात चोरट्यांनी १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. अपहरणानंतर त्यांना राजापूर तालुक्यातील वाटुळ येथे महामार्गावरील पुलावर सोडून चोरटे पसार झाले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह तीन पथके कार्यरत आहेत.

धनंजय केतकर हे साखरपा येथील मित्र बापू शेटये यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन चारचाकी गाडीने रात्री १०.१५ वाजता देवरुखकडे निघाले होते. वांझोळे गावाजवळ आल्यानंतर अज्ञात ईरटीका गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर गाडीतील व्यक्ती पैशाची मागणी करत वाद घालू लागले. या दरम्यान ईरटीकातील तिघांनी केतकर यांना जबरदस्ती गाडीत बसवून डोळ्यावर काळी कॅप घातली. गाडीत एकूण पाच जण होते. त्यांनी केतकर यांच्या अंगावरील तीन सोन्याच्या चैन आणि २० हजार रुपये लुटले. केतकर यांच्या डोक्यावर जड वस्तू ठेवून धमकावण्यात आले.

यानंतर दुसऱ्या वाहनात केतकर यांना हलवण्यात आले. त्या वाहनातील व्यक्तींनी ५ लाख रुपयांची खंडणी मागणी करून केतकर यांच्याकडून त्यांच्या मुलीला फोन करण्यास सांगितले. मात्र रात्री ११.४५ वाजता या अपहरणकर्त्यांनी केतकर यांना कोणतीही इजा न करता वाटुळ पुलावर सोडले व पसार झाले.

केतकर यांना राजापूर पोलिसांचे गस्त पथक भेटले. त्यांनी तत्काळ सर्व हकीकत सांगितली. राजापूर पोलिसांनी देवरुख पोलिसांना कळवून केतकर यांना सुरक्षित आणले. देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांनी तत्काळ कारवाई करत अपहरण व चोरीबाबत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, निरीक्षक झावरे, राजापूर निरीक्षक श्री. लब्धे, नितीन ढेरे, हेड कॉन्स्टेबल मसुरकर व सचिन कामेरकर करत आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, डॉग स्कॉड व ठसे तज्ञ यांच्या साहाय्याने कसून तपास सुरू असून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 19-09-2025