राजापूर : तालुक्यातील जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी ‘सुंदर अक्षर हा अनमोल दागिना आहे’ या उक्तीप्रमाणे बालवयामध्ये मुलांच्या हाताला सुंदर, वळणदार आणि टपोरे अक्षर काढण्याची सवय लावणारा ‘हस्ताक्षर सुधार उपक्रम’ सुरू केला आहे. आजपर्यंत तालुक्यातील तब्बल २३ शाळांमध्ये त्यांनी हा उपक्रम राबविला असून, त्याचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे.
सुंदर हस्ताक्षर काढण्याच्या बालवयामध्ये मुलांवर संस्कार करणे, त्याच्या जोडीने हस्ताक्षर सुधारण्याच्या उद्देशाने उपक्रमशील शिक्षक गोंडाळ यांच्यावतीने मोफत हस्ताक्षर सुधार उपक्रम राबविला जात आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात असलेल्या या उपक्रमाचा लाभमाध्यमिक विद्यालय जुवाठी, जिल्हा परिषद शाळा जुवाठी, बालकाश्रम ओणी, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर कणकवली, राजापूर हायस्कूल, जीजीपीएस इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी, लांजा महिलाश्रम, जिल्हा परिषद शाळा हातिवले, जिल्हा परिषद शाळा काशिगि, जिल्हा परिषद शाळा जावडे लांजा, जिल्हा परिषद शाळा कोंढेतड-गाडगीळवाडी, जिल्हा परिषद शाळा शीळ नं. १, शीळ नं. २, गोखले कन्याशाळा राजापूर, जिल्हा परिषद शाळा गुजराळी, जिल्हा परिषद शाळा सोलगाव, जिल्हा परिषद शाळा राजापूर नं. २ (वरचीपेठ), विश्वनाथ विद्यालय, जिल्हा परिषद शाळा धोपेश्वर, जिल्हा परिषद शाळा महाळुंगे, जिल्हा परिषद शाळा केरावळे, जिल्हा परिषद शाळा माईन कणकवली (सिंधुदुर्ग) या शाळांमधील विद्यार्थ्यांना झाल्याची माहिती गोंडाळ यांनी दिली.
असा राबवला जातो उपक्रम
या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना गोंडाळ यांच्याकडून सुलेखनाची एक वही मोफत दिली जाते. या वहीच्या माध्यमातून मुलांना हस्ताक्षरातील काना, मात्रा, उकार, वेलांटी यांचे मार्गदर्शन करताना सराव करून घेण्यात येतो, याशिवाय व्हॉटस अॅप ग्रुपद्वारे सहभागी विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर काढण्यासंबंधी गोंडाळ यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 19/Sep/2025












