देवळे घाट मार्गावर चिखलातून जीवघेणा प्रवास

साखरपा : सध्या सुरू झालेल्या पावसाचा फटका देवळेघाटातून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर आलेली माती आणि त्यामुळे पसरलेल्या चिखलाचे साम्राज्य यामुळे रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. काही ठिकाणी दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघातही झाले आहेत.

देवळेघाटात बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम पावसाळ्यातही सुरू आहे. रस्त्याशेजारील डोंगर खणण्यासाठी पोकलेनचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. येथील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी डोंगरातील माती आणि दरड रस्त्यावर येण्याचा धोका आहे.

गेले चार दिवस पुन्हा पाऊस पडू लागला आहे. गेले दोन दिवस रात्रीच्यावेळी देवळेघाट परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे खोदलेल्या डोंगरातील माती महामार्गावर आल्यामुळे महामार्गावर चिखलाचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. या चिखलातून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर मोठी वाहनेही चालक बऱ्याचवेळा विरुद्ध बाजूने चालवत असतात. त्यामुळेही दुचाकीचालकांचा संभ्रम होऊन अपघात घडत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 19/Sep/2025