गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गटारांमध्ये मासळीची घाण तर अनेक इमारतींच्या मागे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. शृंगारतळी ही कचऱ्याची तळी बनली असल्याचे बोलले जात आहे. गुहागर-विजापूर महामार्गाने येताना शृंगारतळीत प्रवेश करतानाच कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. कचऱ्याच्या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शृंगारतळीत ग्रामपंचायतने प्रशस्त मच्छी मार्केट बांधलेले आहे. तरीसुध्दा अनेक मच्छी विक्रेते मार्केटच्या बाहेर महामार्गावर बसतात. मासळीचे पाणी जवळच्या नाल्यात टाकतात. या ठिकाणी असलेली लाकडाची मिल, हार्डवेअर दुकान तसेच हॉटेल चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. मुख्य बाजारपेठेत मच्छी विक्रेत्यांकडून स्वच्छता राखली जात नाही. येथे नेहमी दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीची घंटागाडी नेहमी शृंगारतळीतून फिरताना दिसते. अनेकजण कचरा गाडीत आणून टाकतात. असे असताना अनेक दुकानांच्या मागे अस्ताव्यस्त कचरा का पडलेला असतो, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच मासळी विक्रेते मासळीची घाण कचरा डेपो ठिकाणी न टाकता एखाद्या गटारात टाकून मोकळे होतात. त्यांच्यामुळे स्वच्छ व सुंदर शृंगारतळीला गालबोट लागत असल्याची ओरड होत आहे.
समस्यांचा विळखा…
शृंगारतळी बाजारपेठेत दररोज मोठ्या संख्येने आसपासच्या गावातील ग्राहक हे खरेदीसाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी साधे स्वच्छतागृह येथे नाही. जे होते ते रस्ता रुंदीकरणात मोडण्यात आले. येथील गटारांची कामेही अर्धवट आहेत. पार्कीग व्यवस्था नाही. त्यामुळे कुठेही वाहने उभी केली जातात. मोकाट जनावरे बाजारपेठेतून नेहमी फिरतच असतात. एकूणच शृंगारतळीला अनेक समस्यांनी घेरलेले दिसून येत असून स्थानिक प्रशासन हतबल झाल्याचे बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 19/Sep/2025














