चिपळूण : चिपळूण शहर परिसरातील भटक्या श्वानांच्या समस्येसंदर्भात नागरिकांच्या मागणीनुसार नगर परिषद प्रशासनाने आयोजित केलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रातील बैठकीत श्वानप्रेमी विरूद्ध नागरिक असा जोरदार वाद निर्माण झाल्याने अखेर या वादाच्या गदारोळात अधिकाऱ्यांनीच बैठकीतून काढता पाय घेतल्याने बैठक निर्णयाविना अपूर्ण राहिली. मात्र, उपस्थित नागरिकांनी श्वानप्रेमींवर चांगलेच तोंडसुख घेऊन आता हे भटके श्वान या श्वानप्रेमींच्या घरात नेऊन सोडावेत तेव्हाच त्यांना सामान्य जनतेला काय त्रास होतो हे कळून चुकेल अशा भावना व्यक्त करून वादातच बैठकीचे इतिवृत्त संपले.
गेली काही वर्षे चिपळूण शहर परिसरात भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. सुरुवातीला त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषदेकडून नसबंदीसह लसीकरणाची तीन ते चार टप्प्यात मोहीम राबविण्यात आली. मात्र, संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी भटक्या श्वानांचा त्रास परिसरातील लहान मुले, वृद्ध व महिला यांना होऊ लागला आहे. प्रसंगी वर्दळीच्या भागात भटक्या श्वानांची टोळकी फिरत असल्याने तसेच वाहनांचा पाठलाग करू लागल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. अनेक भटक्या श्वानांनी पाळीव जनावरे, लहान मुले, महिला, वृद्धांवर हल्ले केले आहेत. या घटनेत गेल्या वर्षभरात सातत्याने वाढ होत आहे. अखेर नागरिकांनी या संदर्भात न.प. प्रशासनाकडे योग्य नियोजन व उपाययोजनेसाठी कार्यवाही करावी अशी मागणी केली. त्यामुळे प्रशासनाने आज (दि. १७) सांस्कृतीक केंद्रात बैठकीचे आयोजन केले.
दरम्यान, बैठकीमध्ये शहरातील सर्व प्रभागातून बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. तसेच प्राणीमित्र संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. सुरुवातीला या संदर्भात प्राणीप्रेमी संघटनेकडून दावा करताना, कोणताही श्वान हा विनाकारण मनुष्यावर हल्ला करीत नाही तर त्यामागे त्याला झालेल्या त्रासातून तो अचानक आक्रमक बनतो. त्या श्वानाला प्रेमाने हाताळल्यास श्वान कधीही हल्ला करीत नाही; परंतु सद्यस्थितीत काही वाहनचालकांच्या धक्क्याने श्वानांचा मृत्यू होतो.
तसेच काहीजण विनाकारण श्वानांना त्रास देतात. अशावेळी अन्य श्वान त्याच्या सहकाऱ्याचा झालेला मृत्यू पाहून तसेच त्याला झालेले दुःख पाहून मनात त्याचा राग ठेवून संबंधित वाहन अथवा नागरिकांवर धावून जातात, असे प्राणीप्रेमींकडून निवेदन झाल्यानंतर उपस्थित नागरिकांतून जोरदार गदारोळ सुरू झाला. त्यातूनच वाद वाढू लागले. अखेर मुख्याधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांनी, समस्या सोडविण्यासाठी आपण आलो आहोत. त्यावर प्रत्येकाला बोलण्याची संधी आहे. त्यामुळे उपाय सूचवा व कायद्याच्या चौकटीत त्यावर निर्बंध आणू अशी माहिती दिली. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानुसार आपण जास्तीत जास्त नियोजन व उपाय करू, असे सूचीत केले. त्यानुसार पशुसंवर्धन अधिकारी सोनावणे यांनी या वादग्रस्त विषयासंदर्भात न्यायालयाने आजपर्यंत दिलेले निर्णय आणि उपाययोजनांची माहिती दिली. दरम्यानच्या काळात संतप्त नागरिकांनी न्यायालयाचे निर्णय तसेच कायदा या गोष्टी मान्य आहेत.
मात्र, त्यातून मार्ग कसा काढायचा याबाबतचा निर्णय या अशा मुद्यांना धरून चर्चा सुरू असतानाच काही नागरिकांकडून कारवाई संदर्भात आक्रमक भूमिका आणि मुद्दे मांडण्यात आले. यावेळी प्राणीमित्रांकडून त्याचे छायाचित्रण सुरू करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्राणीमित्र संघटनेतील सदस्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यातूनच पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, या वादाच्या गोंधळातच अधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याने अंतीम निर्णय झाला नाही. मात्र, संतप्त नागरिकांनी प्राणीमित्रांवर चांगलीच आगपाखड करुन नागरिक म्हणून आम्हाला आता जीविताची काळजी घेण्यासाठी वेगळी भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट केले. यावेळी न.प.चे मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे आदींसह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
श्वानांना खाणे घालणाऱ्यांवर बंधने आणावीत
भटक्या श्वानांच्या समस्येवर प्राथमिक नियोजन म्हणून शहरात भटक्या श्वानांना भूतदयेतून खाणे घालणाऱ्या प्राणीप्रेमींवर बंधने आणावीत. तसेच नागरिकांनी घरातील उरलेले खाद्यपदार्थ घंटागाडीत द्यावेत. कुत्र्यांना खाऊ घालण्याची सवय लावू नये. त्याचप्रमाणे काही हॉटेल व्यावसायिक, चायनिज सेंटर, मटण, चिकन व मच्छी विक्रेते श्वानांना उरलेले अन्न व मांस खाण्यास देतात त्यावर निर्बंध आणावेत. शहरात जास्तीत जास्त स्वच्छता पाळली तरच ही समस्या कमी होण्यास मदत होईल, असाही मुद्दा चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 19/Sep/2025












