Ratnagiri : अॅल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघाची रत्नागिरी नगरपालिकेवर धडक

रत्नागिरी : ५३ वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराचे आश्वासन देऊन कवडीमोल किंमतीने चंपक मैदानाजवळील जमीन अॅल्युमिनिअम प्रकल्पासाठी घेतली होती. त्या जमिनीवर आजपर्यंत साधा एक प्रकल्प सरकार उभारू शकले नाही. आता ती जमीन रत्नागिरी नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्याचा घाट रचला गेला आहे. त्या जमिनीवर घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाही, असा इशारा रत्नागिरी अॅल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघाने देत १८ सप्टेंबर रोजी रत्नागिरी नगर पालिकेवर धडक दिली.

रत्नागिरी नगर पालिकेचा घनकचरा प्रकल्प हा दांडेआडोम येथे होणार होता. तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने हा घनकचरा प्रकल्प रखडला. आता हा प्रकल्प चंपक मैदान येथील अॅल्युमिनिअम प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीवर होणार आहे. या प्रकल्पासाठी पाच एकर जमीन घेण्यात येणार आहे. ५३ वर्षापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांकडून सरकारने ९०० एकर जमीन अॅल्युमिनिअम प्रकल्पासाठी घेतली. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराचे आश्वासन दिले होते.

गेल्या ५३ वर्षात या जमिनीवर एकही प्रकल्प उभा राहिला नाही. त्यामुळे रोजगारही नाही आणि जमिनी गेल्याचे दुख शेतकऱ्यांना भोगावे लागले. त्या सर्व जमिनी परत करा या मागणीसाठी गेली दोन वर्ष रत्नागिरी अॅल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघ आंदोलन करत असताना अचानक ही जमीन रत्नागिरी नगर पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत. त्या जमिनीवर घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गुरुवारी (१८ सप्टेंबर) रत्नागिरी अॅल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघाने रत्नागिरी नगर पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राजेंद्र आयरे, अॅड. अश्विनी आगाशे, उमेश खंडकर, विलास सावंत व इतर शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 19/Sep/2025