रत्नागिरी : भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी मतदारांकडे समर्थ पर्यायाचा कौल मागितलेला असतानाच, ‘उबाठा’च्या उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नाही. रत्नागिरी मतदारसंघासाठी उमेदवारीबाबत मंगळवारी तातडीची बैठक मातोश्रीवर आयोजित करण्यात आली असून, पक्षनेते उद्धव ठाकरे रत्नागिरीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उबाठाचा उमेदवार कोण असणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक व जि. प. माजी उपाध्यक्ष उदय बने यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याने, त्यांचेही नाव चर्चेत आले होते. मात्र, उदय सामंत यांच्या अनुभवावरुन यापुढे बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी नको, अशी थेट भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे बाळ माने यांचे नाव ‘उबाठा’तून मागे पडल्यासारखे झाले होते. अशातच मंगळवारी मातोश्रीकडून ‘उबाठा’चे जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, तसेच उमेदवारीसाठी इच्छूक असलेले सहसंपर्कप्रमुख राजू महाडीक, माजी जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांना बोलावणे आले आहे. मंगळवारी या पदाधिकाऱ्यांशी निवडणुकीबाबत चर्चा होणार असून, बाळ माने यांच्यासंदर्भातही या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता मुंबईतील पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली. त्यामुळे ‘उबाठा’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे लक्ष या बैठकीतील निर्णयाकडे लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 22/Oct/2024









