रत्नागिरी : पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाच्या सूचनेनुसार भाट्ये समुद्रकिनारा येथे येत्या शनिवारी, दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसोबतच तेथे ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
या मोहिमेबाबतची नियोजनाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात येथे श्री. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सागर पाटील, नगरपालिका प्रशासन अधिकारी तुषार बाबर आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. सूर्यवंशी म्हणाले, भाट्ये समुद्र किनारी दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळे बीच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार भाट्ये बीच स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी फिनोलेक्स कंपनीकडे आहे. दरवर्षी बीच क्लीनिंगच्या कार्यक्रमात फिनोलेक्स कंपनीची चांगली मदत होत असते. फिनोलेक्सने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपली जबाबदारी पार पाडावी. समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत नगरपालिका प्रशासनाने आवश्यक साधनसामग्री व यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, कामगार याचा पुरवठा करावा. ग्रामपंचायतीमधील मशीन्स आणि त्यांचे पथक उपस्थितीबाबतचे नियोजन ग्रामपंचायत विभागाने करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 19-09-2025














