चिपळूण : शहरातील भटक्या प्राण्यांना क्रूरतेची वागणूक मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक निर्देशांचे पालन करण्याकरिता नगर परिषदेने आवश्यक ती उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी प्राणीप्रेमी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्राणिप्रेमी संघटनेच्या माध्यमातून काल (दि.१९) मुख्याधिकारी विशाल भोसले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी चर्चेदरम्यान शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. त्यामध्ये शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नसबंदीची व्यवस्था सुरू करावी. ज्या ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध नाही त्या ठिकाणी संघटनेमार्फत नसबंदी करण्यासाठी सहकार्य केले जाईल. तसेच शासकीय दवाखान्यात रेबिजची लस उपलब्ध करावी. विविध कारणांनी जखमी झालेल्या श्वानांवर उपचार करण्याकरिता जागेची सोय करावी, वर्षातून दोनवेळा श्वानांची नसबंदी करता येऊ शकते. जून ते सप्टेंबर कालावधी वगळून ईबीसी कॅम्पच्या माध्यमातून नसबंदी केली जावी.
दरम्यान, श्वानांना पकडण्यासाठी संबंधितांबरोबर प्राणीप्रेमी संघटनेची एक व्यक्ती उपलब्ध करून द्यावी, तसेच शहरातील भटक्या श्वानांना खाद्य घालण्याकरिता विविध ठिकाणी स्पॉट निर्माण करावेत, प्राणीप्रेमी संघटनांसोबत चर्चा करून अशा ठिकाणी ठराविक संख्येच्या श्वानानुसार फिडींग स्पॉट निर्माण करून त्या संदर्भात त्या-त्या भागामध्ये कायदेशिर नोटीस बोर्ड लावावेत. तसेच इतर प्राण्यांशी कसे वागावे यासाठी न.प.ने जागृती अभियानासारखे कार्यक्रम आयोजित करावेत, अशा मागण्यांचे निवेदन न.प.ला देण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 20/Sep/2025












