Sangameshwar : कनकाडीत गोठ्याला आग; कृषी अवजारे जळून पाच लाखांचे नुकसान

साखरपा : कनकाडी (ता. संगमेश्वर) येथे गोठ्याला आग लागून संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. यात कृषी साहित्य आणि इतर अवजारे जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. कनकाडी खालची गुरवावाडी येथील ग्रामस्थ लक्ष्मीकांत शंकर गाताडे हे राहतात. त्यांचा शेती आणि वेल्डिंग हा व्यवसाय आहे. त्यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात जनावरे नसल्यामुळे त्यात त्यांनी शेतीची अवजारे ठेवली होती.

या गोठ्याला गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत आतील सर्व समान तसेच एक नवीन दुचाकी आणि गाताडे यांचा मोबाईल जळून खाक झाला. नव्याने घेतलेली दुचाकी, ७.५ एचपीचा पॉवरटिलर, २ ग्रासकटर, एअर कॉम्प्रेसर, वेल्डिंग मशिन, पाण्याच्या ५०० लिटरच्या ३ टाक्या, पाईपची ३ बंडले, कृषी फवारणी पंप, हॅलोजन लाईट व त्याचे वायरिंग, ग्रीन नेट, पाण्याचे २ ड्रम, वैयक्तिक मोबाईल हे सर्व साहित्य जाळून पूर्ण नष्ट झाले आहे. तसेच गोठाही जळून खाक झाला.

गाताडे यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने आणि शेतीची सर्व अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या आगीचे वृत्त समजल्यावर सरपंच संतोष गोताड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच तलाठी कर्मचारी तृप्ती डोंगरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 20/Sep/2025