रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अभियंत्याकडे कटाक्ष टाकत अपघातांसंदर्भात संपूर्ण अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिल्या आहेत.
रस्ता सुरक्षा समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते. बुधवारी हातखंबा गावातील उतारावर कोळसावाहू ट्रकची अनेक वाहनांना धडक बसली. कार, दुचाकी, रिक्षाचे या अपघातात मोठे नुकसान झाले, त्याचबरोबर झरेवाडी येथील शिवम गोताड या विद्यार्थ्याचा मृत्यु झाला. या अगोदरही महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत तीव्र चिंता व्यक्त केली.
राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्याकडे कटाक्ष टाकत जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम कधी पुर्ण होणार अशी विचारणा करत जी अपघाताची ठिकाणे होती तेथे काय काय उपाययोजना केल्या? अशी प्रश्नांची सरबती करत पुन्हा एकदा संपुर्ण अहवाल बनवून सादर करण्याच्या सुचना केल्या. यामध्ये अपघातांची संख्या, अपघातांची ठिकाणे, अपघातांची कारणे, केलेल्या उपाययोजना अशी संपुर्ण माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर दुर्घटना होणार नाहीत याबाबत योग्य खबरदारी घेण्यासही सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 20/Sep/2025












