◼️ पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छतादूतांचा सन्मान; रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
रत्नागिरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रत्नागिरीतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता दूतांना आवश्यक अशी स्वच्छता उपकरणं वाटून त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे स्वच्छतादूतांमध्ये समाधानाचं वातावरण होतं.
स्वच्छता दूतांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप
रत्नागिरी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छतादूत अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करतात. अनेकदा आवश्यक साहित्याची कमतरता असल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या माजी नगरसेवकांनी पुढाकार घेत १०० गमबूट, २५ घमेली, २५ फावडे, ५० खुरपी आणि १०० जोड्या हँडग्लोज स्वखर्चाने खरेदी करून स्वच्छतादूतांना वितरित केल्या. या वेळी सर्वांना अल्पोपहारही देण्यात आला. हे साहित्य मिळाल्यानंतर स्वच्छतादूतांनी आभार व्यक्त केले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, माजी नगरसेवक राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी, समीर तिवरेकर, मानसी करमरकर, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर यांच्यासह स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे, हर्षवर्धन काटकर, प्रशासकीय अधिकारी श्री. बेहरे आणि विद्युत निरीक्षक जितेंद्र विचारे उपस्थित होते.
नागरिकांनाही स्वच्छतेसाठी सहभागाचं आवाहन
या वेळी बोलताना माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी सांगितलं की, “आम्ही फार मोठं काम केलेलं नाही. खरं काम तर हे स्वच्छतादूत करतात आणि त्यांच्यामुळेच रत्नागिरी शहर स्वच्छ राहू शकतं. परंतु, केवळ त्यांच्या कामावर अवलंबून न राहता नागरिकांनीही सहकार्य करावं. कचरा रस्त्यावर न टाकता तो वर्गीकृत करून घंटागाडीमध्येच द्यावा.”
स्वच्छता साहित्याची ही मदत मिळाल्यानंतर सर्व स्वच्छतादूत तातडीने भाट्ये येथील स्वच्छतेच्या कामासाठी रवाना झाले. कामावर जाण्याची त्यांची लगबग सुरू असली तरी त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 20-09-2025












