Ratnagiri: रत्नागिरी वन विभागास सर्वसाधारण विजेतेपद; सांगली येथील अखिल भारतीय वनक्रीडा स्पर्धेत पटकावली तब्बल 35 पदके

चिपळूण : कुंडल (जि. सांगली) येथील वनअकादमीत झालेल्या 28 व्या अखिल भारतीय वनक्रीडा स्पर्धेत रत्नागिरी वन विभागाच्या चिपळूण येथील अधिकारी, कर्मचार्‍यांनी कौतुकास्पद कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांमध्ये 17 सुवर्ण, 11 रौप्य व 7 कांस्य अशी एकूण 35 पदके पटकावत विभागस्तरावरील सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.

अखिल भारतीय वनक्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने वन अकादमी कुंडल येथे कोल्हापूर वनवृत्तातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील मिळून सहा वन विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. स्पर्धेत सर्व विभागाचे सुमारे 300 स्पर्धक खुला गट, वेटरन, सीनियर वेटरन व महिला गटात सहभागी झाले होते. विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी एकेरी कॅरममध्ये सुवर्णपदक, बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक आणि बॅडमिंटन मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवले. सहाय्यक वनरक्षक अंकिता तरडे यांनी कॅरममध्ये रौप्यपदक मिळवले. चिपळूण परीक्षेत्र वनाधिकारी सर्वर खान यांनी थाळीफेकमध्ये सुवर्णपदक, एकेरी कॅरम प्रकारात रौप्यपदक, गोळाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवले. दापोलीचे परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी सीनियर वेटरन थाळीफेकमध्ये ब्रॉन्झ, गोळाफेकमध्ये रौप्यपदक मिळवले.

परिक्षेत्र वनाधिकारी आर. आर. पाटील यांनी टेबलटेनिस खेळात कांस्यपदक आणि रायफल शुटिंगमध्ये रौप्यपदक, तर वनपाल जी. एम. पाटील यांनी 100 मीटर धावणे आणि लांब उडीमध्ये सुवर्णपदक मिळवले. वनरक्षक दत्तराम सुर्वे यांनी गोळाफेक आणि थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक, लांब उडीत रौप्यपदक मिळवले. श्रावणी पवार यांनी 800 मीटर चालणे सुवर्ण तर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले. किशोर दड्डे यांनी 100 मी. धावणेत रौप्यपदक, 200 मी. धावणे कांस्यपदक आणि रिले रनिंगमध्ये कांस्यपदक मिळवले. रोहिणी पाटील यांनी धावण्याच्या प्रकारामध्ये पाच सुवर्णपदके मिळवली आहेत. संजय चिमुकले यांनी एकेरी कॅरममध्ये सुवर्णपदक, ऋषिकेश शिंदे यांनी 100 मी. धावणेत रौप्यपदक तर रिलेमध्ये सुवर्णपदक, विशाल पाटील यांनी 400 मी.?धावणेत कांस्य, रिले रनिंगमध्ये सुवर्ण तर राहुल गुंठे यांनी रिलेमध्ये सुवर्ण, प्रणीत कोळी यांनी सुवर्णपदक, अर्जुन जाधव यांनी थाळीफेकमध्ये रौप्यपदक, अरूण माळी यांनी बॅडमिंटन एकेरीत रौप्यपदक, मिश्र दुहेरीत सुवर्ण आणि बॅडमिंटन दुहेरीत रौप्यपदक, सहयोग कराडे याने बॅडमिंटन दुहेरी प्रकारात रौप्यपदक, छाया गोपनेने रिले रनिंगमध्ये कांस्यपदक मिळवले. यशस्वी खेळाडू व वन कर्मचारी, अधिकार्‍यांचे कौतूक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 20-09-2025