रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कोंडगाव (ता. संगमेश्वर) येथे विधी साक्षरता शिबिर पार पडले. शासनाच्या योजनांचा, सुविधांचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडगाव समूह ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रभारी सरपंच श्रद्धा शेट्ये, ग्रामविकास अधिकारी प्रवीण माईन उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, समाजातील तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. त्याची उन्नती व्हावी, यासाठी शासन विविध योजना, सुविधा देत आसते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची जनजागृती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विधी सेवा साक्षरता शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत असते. लाभार्थ्यांनी या योजनांचा, सुविधांचा फायदा घ्यावा आणि इतरांनाही घेण्यासाठी याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी.
सार्वजनिक सेवा व केंद्र, राज्य सरकारच्या योजना आणि नैसर्गिक, मानव निर्मिती आपत्तीमुळे पीडित लोकांना विधी सेवा या विषयावर मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील म्हणाले, लोकांचे कल्याण व्हावे, लोकांचे जीवनमान सुधारावे, त्यासाठी विविध योजना शासनामार्फत केल्या जात असतात. त्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. सर्व योजना आणि त्याचा लाभ उपेक्षित व्यक्तीला मिळावा, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. प्राधिकरणामार्फत जनजागृती करणे, कायदे पोहोचवणे, कायद्याच्या तरतुदी पोहोचविणे, प्रत्येकाला न्याय मिळावा आणि सामाजिक न्याय साधण्यासाठी असे कार्यक्रम घेतले जातात. योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यामध्ये काही अडचणी येत असतील, तर त्या अडचणी दूर केल्या जातात.
भारतात अनेक कायदे आहेत आणि हे कायदे आपल्या सर्वांनी पाळणे आपल्यावर बंधनकारक आहे. गैरवर्तन केले गेले, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. गरजू आणि उपेक्षित लोकांना खटला लढण्यासाठी मोफत वकील दिला जातो आणि तो जिल्हा विधी सेवा प्राधिकरण देत असतो. त्याचबरोबर जिल्हा न्यायालयातदेखील जर केस लढवायची असेल, तर जिल्हा न्यायालयातदेखील मोफत वकील दिला जातो. उच्च न्यायालयात जायचं असेल, तर तिथेदेखील मोफत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल करायची असेल, तरीदेखील मोफत वकील दिला जातो.
महिलांना त्याचबरोबर अपंग व्यक्ती असेल, लहान मुलांना किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशा मुलालादेखील वकील मिळतो. जी व्यक्ती तुरुंगात आहे, मुले लहान असतील अशा तुरुंगातल्या आरोपीलादेखील मोफत वकील मिळतो. सरकारने निर्माण करून दिलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असेही श्री. पाटील म्हणाले.
मनोधैर्य योजनेची माहितीही त्यांनी यावेळी दिली. रत्नागिरी तालुक्यातील 125 मुलांना आधार कार्ड प्राधिकरणामार्फत मिळवून दिले आहे. योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी आवर्जून जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगून त्याचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी श्री. माईन यांनी आभार मानले. शिबिराला अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 20-09-2025












